टीप – सदर कथा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देण्यासाठी लिहिली गेली नाहीये. शिवाय कथेमध्ये लिहिले गेलेले स्थळ, काळ आणि व्यक्ती वर्णने हि काल्पनिक असून त्याचा वास्तविकतेशी संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजण्यात यावा आणि तोंडात (स्वतःच्या) बोटे घालून आश्चर्य व्यक्त केले जावे.
******
नरहरी पंडित सडकेवरून भरभर चालले होते. तळपणाऱ्या सूर्यापेक्षाही त्यांच्या केशविरहित डोक्यामध्ये प्रचंड आग भरली होती. त्या आगीसमोर सूर्याचा दाह शीतल वाटावा इतकी ती तप्त होती. आजवर भूक, दारिद्र्य आणि विवंचना ह्याची तमा न बाळगलेल्या, एका विद्येशी प्रामाणिक अशा पंडितावर अपमानाचा आसूड चालवला गेला होता. आजवर सत्याच्या बाजूनेच उभे राहत त्यांनी कोणाशीही कसलाच खोटेपणा केला नाही. पैशासाठी दांभिक पणा करणारया ज्योतिषांपैकी नरहरी पंडित नव्हते. त्यांना आज असल्या हिणकस आरोपांना सामोरे जावे लागले होते.
“पैशासाठी काहीही करू शकतात असली दळभद्री माणसे …” एवढे नीच वाक्य त्यांच्याबद्दल उच्चारले गेले होते. सतत ते वाक्य त्यांच्या मस्तकात दणके देत होते.
अर्थार्जनासाठी विद्या वापरली असती तर कदाचित शहरातल्या मोठ्यात मोठ्या व्यक्तींमध्ये गणना होण्याइतपत पैसा नक्कीच कमावला असता. पण गुरुआज्ञा आणि ग्रहण केलेल्या विद्येचा बाजार न मांडण्याचा वैयक्तिक प्रण ह्या मुळे त्यांनी सतत त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीचे हितचं साधले होते. त्यांची मृदू वाणी त्यांच्या मनातला कनवाळूपणा दर्शवत असे. त्यांच्याकडे अडचणी घेऊन येणार्यामध्ये श्रीमंत, गरीब असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. सर्वच जीवांना मृत्युलोकीं समान दर्जा असतो. केवळ द्रव्यार्जन जास्त करून भौतिक सुख जास्त भोगणारे उच्च आणि पोटासाठी कष्ट करणारे नीच दर्जाचे असे त्यांना कधीही वाटले नाही.
त्यांनी कधीच दक्षिणेसाठी हात पुढे केला नाही कि कधी कशासाठीच लाचारी पत्करली नाही. साठीत आलेल्या नरहरी पंडितांच्या विद्वत्तेला मानत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणारे लाभार्थी मात्र वाढत गेले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कायम घराबाहेरच्या व्यक्ती जोडल्यामुळे कधीही संसार करण्याचं मनात आणलं नाही. कदाचित परोपकारासाठी आणि विद्येच्या अखंड साधनेसाठी त्यांना संसार अडचण वाटली असावी. शिवाय विकारांवर प्रभुत्व मिळवल्याशिवाय निर्लेप साधना करता येत नाही असे त्यांच्या गुरूनी त्यांना सांगितले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य विकारांवर ताबा मिळवत ज्ञानार्जन आणि साधनेत घालवले होते. आजचा प्रसंग घडण्यासाठी कारण होते कि त्यांनी स्वतःच आजन्म पाळलेला नियम मोडला. ते कधीही कोणाच्या घरी जात नसत. ज्यांना गरज होती ते लोक त्यांच्याकडे येत होते. कोणाचाही उंबरा ओलांडून त्यांनी कसलाही पाहुणचार कधी घेतला नव्हता. अतिशय व्रतस्थ असे आयुष्य घालवलेल्या नरहरी पंडितांना आपण असे का केले? ह्याचाही राग आला होता. पहिल्यांदाच त्यांनी खूप जुन्या परिचितांचे ऐकले होते.
श्री. गणराज देशमुख. शहरातले नामी व्यक्तिमत्व. उद्योग व्यवसायात आणि राजकारणात अग्रगण्य. गेले कित्येक वर्षे पंडितजींच्या सल्ल्यासाठी त्यांच्याकडे येत होते. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय गणराजसाहेबांनी कधीच कुठले महत्वाचे काम केले नाही. त्यांच्या मुलगा ,अरिहंतचा नुकताच साखर पुडा झाला होता. त्याच्या लग्नाची तारीख साखरपुढ्यात काढता आली नाही कारण तिथे पंडितजी उपस्थित नव्हते.
अरिहंत तरीपण मागे लागला होता. “कोणीही ज्योतिष तारीख काढून देईल एवढं काय त्यात.” असे त्याचे म्हणणे होते. खरेतर त्याला ह्या सगळ्यावर अजिबात विश्वास नव्हता. त्याने कधीही वडिलांसोबत जाऊन नरहरी पंडितजींची भेट घेतली नव्हती. त्यात शिक्षणासाठी ४ वर्षे बाहेर देशात राहून आल्यामुळे एक प्रकारची बंड विचारसरणी त्याच्या डोक्यात घुसलेली होती.
“उगाच कोणीतरी काही म्हणत आहे त्याला म्हणण्याला महत्व देऊन मी माझ्या आयुष्याचे निर्णय का घ्यायचे?” अशी त्याची भूमिका होती. पण वडिलांसमोर त्याचे काही चालले नाही. त्यांनी त्याला समजावले. नरहरी पंडितजींना बोलावणे धाडले तर त्यांनी स्पष्ट नकार कळवला होता
हा आणखी एक प्रसंग घडला ज्यामुळे अरिहंत पंडितजींवर चिडला. ” अरे कोण आहे हा माणूस एवढा? इतका काय भाव खातोय?” अरिहंतचा थयथयाट चालू होता. त्याला त्याच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी कोणाची तरी मिन्नतवारी करावी लागत आहे ह्याचा भयानक त्रास होत होता. त्याला कारण होते ते म्हणजे ज्या मुलीसोबत त्याचे लग्न ठरले होते ती.
“शाल्मली. दिघे ह्या त्याच शहरातल्या प्रतिष्ठित कुटुंबातली थोरली मुलगी. २२ वर्षे वयाची शाल्मली खूपच भारदस्त व्यक्तिमत्वाची होती. उंच पुरी सायीसारखी गोरी. भुरकट केस. भरलेल्या अंगकांतीची शाल्मली पाहून एका भेटीतच अरिहंत तिच्यासाठी वेडा झाला होता. लाजाळू आणि गोड आवाजाची शाल्मली जितकी सोज्वळ होती तितकीच मादक शस्त्रे बाळगून होती. शिक्षण संपवून ती घरीच होती. नृत्य, गायन, संगीत सर्वांचे प्रशिक्षण घेऊन त्यात आवड असल्यामुळे तरबेज झालेली शाल्मली देशमुख कुटुंबियांना खूपच आवडली होती. तिचा स्वभाव खूपच शांत आणि गहिरा होता. अंगात उच्च अभिरुची असल्यामुळे साहजिकच वागण्या बोलण्यात एक खानदानी पणा होता. अरिहंत तर तिच्यासोबत लग्न करण्यासाठी खूपच आतुर झाला होता. दिघे थोडे परंपरांना जपणारे असल्यामुळे लग्नाआधी अरिहंतला शाल्मलीने भेटण्यासाठी त्यांचा काहीसा विरोध होता. तिचा सहवास मिळवण्यासाठी तो पिसाळला होता. साखरपुडा झाल्यांनतर त्याला वाटले होते कि एखाद्या महिन्यातच लग्नाची तारीख निघेल आणि आपण शाल्मली सोबत लग्न उरकू.
नरहरी पंडितांना घरी आणण्यासाठी शेवटी स्वतः गणराज देशमूख हात जोडून गेले. खूपच आग्रह केल्यावर पंडितजींना त्यांचे मन मोडता आले नाही. त्यांना गाडीतून स्वतः गणराज साहेब घेऊन आले. त्यांच्या घरी शाल्मलीचे वडील शंकरराव दिघे सुद्धा होते. ते स्वतः देखील पंडितजींना खूप मानत होते. अरिहंतने पहिल्यांदाच त्यांना पहिले. शरीरावर भगवी कफनी ओढलेला, आखूड धोतर घातलेला, अनवाणी पायानी आलेला तो म्हातारा माणूस पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. शाल्मलीचे वडील आणि आई दोघेजण त्यांच्या पाया पडले. गणराजसाहेबांनी सुचवून पण अरिहंतने त्यांना नमस्कारदेखील केला नाही. पंडितजींना त्याचे काही वाटले नाही.
त्यांनी सर्वांदेखत पंचांग उघडले. दोघांच्याही कुंडल्या समोर घेतल्या. १-२ मिनिटे त्यांनी चाळले. त्यांच्या कृतीकडे सगळेजण श्रद्धाभावाने पाहत होते. अरिहंत मात्र तुच्छतेने पाहात होता. त्यांनी कुंडल्या आणि पंचांग पहिले. दिघे आणि देशमुख कुटुंबीय त्यांच्याकडे आशेने पाहात होते.
“पंडितजी काही अडचण आहे का?” देशमुख साहेबानी विचारले.
“देशमुख साहेब. मी कधीही खोटे बोलत नाही. गुरु चरणाची शपथ घेऊन सांगतो. हे लग्न लाभत नाही.” स्पष्ट आवाजात सडेतोडपणे त्यांनी एकच वाक्य बोलून दाखवले.
“लग्न लाभत नाही म्हणजे?” अरिहंत चवताळून ओरडला आणि उठला. आधीच त्याच्या मेंदूला पंडितजींकडे पाहून झिणझिण्या आल्या होत्या. त्यात त्यांचे हे वाक्य ऐकून त्याचा राग उसळून बाहेर आला.
गणराज साहेबांनी अरिहंतकडे हात केला आणि त्याला थांबवले.
“पंडितजी. तुमच्या वाक्याला कुठल्याही शपथेच्या प्रमाणाची गरज नाहीये. तुम्ही बोललात त्यावर माझा आणि दिघे साहेबांचा संपूर्ण विश्वास आहे.” त्यांनी दिघे साहेबांकडे पहिले ते खाली बघत होते.
“लग्न लाभत नाही म्हणजे. मुलीचे ग्रह बळ चांगले आहे. मुलाचे नाही. हे लग्न होईल. पण सुफळ होण्यासाठी मुलाला स्वतःमध्ये खूप बदल घडवून आणावे लागतील. जसे कि सात्विकपणा, संयम आणि क्रोधावर नियंत्रण. हे न झाल्यास मुलगी होरपळेल. दोघांच्या कुंडल्या पाहिल्यातर दिसते कि मुलगा तामसी आहे मुलगी सात्विक आहे. दोघांच्याही जन्मावेळांवरूनच आपण अंदाज बांधू शकतो.” पंडितजी म्हणाले.
“ओ बुवा तूम्ही उघड उघड माझी निंदा करत आहात. डॅडी तुम्ही चक्क ऐकून घेताय. मी तामसी आणि तापट. माझ्याकडे संयम नाही. कोण आहे हा माणूस माझ्यावर टिप्पणी करण्याइतका मोठा?” अरिहंत बडबड करू लागला.
“अरिहंत. तोंड सांभाळून बोल. तुझा विश्वास नसेल तर ठीक आहे पण त्यांच्या वयाचा मान राखून तरी वर्तन ठेव.” गणराज साहेब म्हणाले.
“अरे पण का? कुठलाही दीड दमडीचा माणूस उठतो आणि माझ्यावर टिपणी करतो. माझ्या आयुष्याच्या प्रश्नांशी खेळतो. मी नाही सहन करणार.” तो उत्तरला.
“अरिहंत!” गणराज साहेब कडाडले.असा सर्वांसमोर पाणउतारा करणे उचित नाही.” पंडितजी शांत पणे म्हणाले.
” पंडितजी तुम्ही तर ज्ञानी आहात. ह्यातून तुम्ही मार्ग काढा.” दिघे म्हणाले.
“दिघे साहेब. मार्ग एकच. अरिहंतने स्वतःशी ठरवले कि त्याच्या स्वभावाशी विसंगत असे आत्मसंयमन करेल तरच तो मुलीसाठी सुसह्य होईल. कारण मुलगी सोनं आहे. मुलाने स्वतःला तिच्या पात्र बनवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करायला हवे.” पंडितजी म्हणाले.
“म्हणजे माझ्या पोटी जन्माला आलेला देशमुख घराण्याचा वंशज नालायक आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? तुम्हाला आम्ही लग्नाची तारीख काढायला बोलावले होते. माझ्या मुलाची लाज काढत बसला आहात तुम्ही तर.” देशमुखांची पत्नी आणि अरिहंतची आई सुलक्षणाबाई मध्ये पडल्या. त्यांनी अरिहंची वारंवार होणारी उपेक्षा पहिली आणि त्यांना पुत्रप्रेमाचा कढ आला.
” असे नका म्हणू. मी फक्त त्याच्या मध्ये असलेल्या काही त्रुटींबद्दल बोललो. त्या दूर केल्यातर त्याच्याच आयुष्यासाठी चांगले आहे.” पंडितजी म्हणाले.
“अरे तू कोण आहेस माझ्याबद्दल नाही ते बोलणारा. शंभर दोनशे रुपयांसाठी हात पसरायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचे काम तुझे. मोठे घर दिसले कि उगाच कसल्यातरी मोठाल्या गप्पा मारून जास्त पैसे उकळायचा धंदा तुझा. तू मला जोखणार मी कसा आहे?” अरिहंत म्हणाला.
गणराजसाहेब अतिशय अस्वस्थपणे उठले. “तू कोणाबद्दल का बोलतोयस कळतंय का तुला? अरे नीच माणसा. थोडीतरी लाज बाळग.” गणराजसाहेब मुठी आवळत म्हणाले.
“मुला, मला पैसे कमवायचे असते तर मी तुमच्या लेखी असणाऱ्या उच्च स्थानी तुझ्यापेक्षाही कमी वयात असताना गेलो असतो. जे आहे ते सांगतो मी. चालतो आता. देशमुख साहेब मी तुम्हाला तारखा कळवतो. येतो.” नरहरी पंडित निघाले होते. तितक्यात मागून अरिहंत परत मागून ओरडला.
“जा जा थेरड्या.. कसल्या तारखा काढतोस? तारखा बघून कामे करायला मी तुझ्यासारखा पुचाट नाहीये. मनगटाच्या जोरावर सगळे कमावणारी पिढी आहे आमची. तुझ्यासारख्या पाखंड्याना भीक नाही घालत. कुठे चाललास तू?” असे म्हणत तो तणतणत पंडीतजीं जवळ गेला आणि पाचशेच्या ४-५ नोटा त्यांच्यावर भिरकावल्या.
ज्यासाठी आला होतास ते काम करून जा. उचल ते पैसे आणि निघ इथला. नरहरी पंडित न थांबता सरळ चालू लागले.
पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले कि त्यांचे पारंपरिक पंचांग आतच राहिले होते. ते मागे वळले.
“नाहीतर काय? मेले हे लोक पैसे मिळावे म्हणून असेच काहीतरी खोटेनाटे सांगतात मग हि शांती, ती पूजा… असले काहीबाही काढायचे आणि आणखी पैसे उकळायचे.” सुलक्षणाबाई म्हणत होत्या.
“तुम्हाला काहीहि माहित नाही पंडितजींबद्दल. नाही ते बरळू नका.” गणराजसाहेब म्हणाले. ते आई आणि मुलाच्या सयुंक्त बोलण्याने हतबल झाले होते.
“देशमुख साहेब मुलांच्या मनात आहे लग्न करायचे मग आपण का उगाच त्यांचे मन दुखवायचे. मलाही पंडितजींबद्दल आदर आहे. पण म्हणून मी मुलांचे मन नाही दुखावणार.” दिघे म्हणाले. दिघेंना देशमुखांसारखे मातब्बर घराणे गमवायचे नव्हते. अरिहंत कसाही असलातरी करोडोंचा मालक होणार होता. शाल्मली त्या घरात महाराणी बनून राहणार होती. त्यांना हेच खूप होते.
“पण..” गणराजसाहेब काही बोलणार तेवढ्यात अरिहंत म्हणाला. “डॅडी हि त्या बुवासारखी दळभद्री माणसे पैशासाठी काहीही करू शकतात…” ते शब्द पंडितजींच्या कानावर पडले.
” माझ्यासारखे काहीही करू शकतात? पैशासाठी? एवढा उपमर्द? अरे इतकी कठोर साधना करून लोकहित साधलं. कधी कोणाकडून कसल्याच द्रव्याची मागणी केली नाही. सगळं व्यर्थ गेलं आणि कोणाकडून हा अपमान करून घेतला आपण. एका यःकश्चित माणसाकडून जो फक्त एका श्रीमंत बापाच्या घरात जन्माला आला. त्याचे कर्तृत्व काय? किती उपेक्षा सहन करायची? मला माझा स्वाभिमान आहे कि नाही. भौतिक जगामध्ये ज्या लोकांकडे पैसे आहेत तेच उन्मत्त होणार का? मग आमच्यासारख्या साधकांचे काय ज्यांनी प्रचंड शक्ती कमावून ठेवली आहे ज्यासमोर हे लोक किडयांसारखे तुच्छ आहेत. आम्ही कधी दाखवणार आमचे प्राबल्य? ” तप्त रस्त्यावरून अनवाणी चालत नरहरी पंडितांचे विचारचक्र चालू होते.
“मी काय करू शकतो असे वाटून आज माझा एवढा अपमान झाला. आजवर असा लांच्छनास्पद प्रकार पाहावा लागू नये म्हणून मी कसलीही याचना केली नाही. तरीपण मला हे बघावे लागले. मी ह्याचा सूड घेणार. नक्कीच घेणार. पोरा तुला माहित नाही कशाशी खेळत आहेस तू? हा नरहरी काय करू शकतो तुला कळेल. लवकरच कळेल.” ह्या आणि अशा प्रकारच्या कित्येक वैचारिक चढउताराना पार करत पंडितजी त्यांच्या घरी आले.
घरात येताच तडक त्यांनी एका जुनाट पेटीमधून एक पोथडी बाहेर काढली. त्यांचे सर्वांग थरथरत होते. आयुष्यात त्यांना कधीच जी विद्या वापरावी लागणार नाही त्यासाधनेसाठी त्यांनी मनाची सिद्धता केली. स्वतःचा सौदा करून ते आता अघोर कर्म करणार होते. मनात योजना तयार होती. अवकाश होता अमावास्येचा ज्यावेळी तम् शक्तींचे प्राबल्य विश्वात वाढलेले असते. त्यावेळी ते साद घालणार होते दुसऱ्या मितीमध्ये वावरणाऱ्या काही शक्तींना. त्यांना जे माहीत होते त्यात आणखी भर घालून ते त्या योजनेची तयारी करणार होते. त्यांच्या समोर अरिहंत दिसत होता. त्याच्या असंयमित घमेंडीला तिची लायकी दाखवायची होती. ऐहिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठण्यासाठी उतावीळ झालेल्या त्या किड्याला नरहरी पंडित चिरडणार होते.
त्यांनी पोथी उघडली आणि वाचायला घेतली.
– क्रमश: