ब्लॅक इन गोवा भाग- ६

गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. नेहा हा नवखा प्रदेश सारं काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहळत होती. इन्स्पेक्टर चारूशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. केतकी मात्र शून्यात नजर हरवुन बसली होती.

“चल, उतर गाडीतून. ” दरडावण्याने ती भानावर आली. निमूटपणे उतरून ती नेहा शेजारी थांबली. नेहाने तिचा हात आपल्या हातात घट्ट दाबुन धरला. आणि डोळ्यात विश्वासाने पाहिले. तेवढ्यात दोघीना हाताला धरून जवळजवळ ओढतच चौकीत नेले गेले.

इन्स्पेक्टर चारूशीला मोरे चोकीत शिरताच आतमध्ये एकच धावाधावा सुरु झाली. कोणी आपला टेबल आवरे तर कोणी आपला युनिफॉर्म नीट करे. एका महिला पोलीसने तर चक्क गजऱ्याची पुडी पट्टदिशी मुठीत दाबत ड्रॉवरमध्ये फिरकावली. कोपऱ्यातली दोघांची मिसळ पावाच्या दोन भरल्या डिश लपवताना बरीच धांदल उडाली. कदाचित नित्याची करमणूक असावी म्ह्णून इन्स्पेक्टर मोऱ्यांनी सर्व प्रकाराकडे कानाडोळा केला. पण नेहाच्या चाणाक्ष नजरेतुन मात्र यातील एकही गोष्ट सुटली नाही. पण आपण पोलीस चोकीत आहोत या कल्पनेने केतकीला कापरं भरलं.

इन्स्पेक्टर मोरे डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर ठेवत समोरच्या फाईल्सकडे नजर टाकुन खुर्चीत बसल्या. नेहा आणि केतकीला खासकन ओढत त्यांच्यासमोर येऊन बसवले गेले. या ओढाताणीने वैतागलेल्या नेहाने त्या पोलीस बाईवर जळजळीत एक कटाक्ष टाकला. तशी पोलीस सहकारी जरा चपापली. तेवढ्यात इन्स्पेक्टर मोऱ्यांनी दोघीना विचारले,

“तुमच्यापैकी गाडी कोण चालवतं ?”

दोन क्षण दोघीही गप्प बसल्या. नंतर केतकीकडे पाहत तिला डोळ्यानी खुणावत नेहा इन्स्पेक्टर मोऱ्यांना म्हणाली.

“फक्त मी चालवते.”

“या ‘फक्त’ चा अर्थ नक्कीच दोघीही चालवता असाच आहे ना केतकी?? केतकीकडे क्रोधीत नजरेने पाहत इन्स्पेक्टर मोऱ्यांनी आवाज चढवला.

” हो” त्यांच्या या अनपेक्षित हल्ल्याने भेदरलेली केतकी उत्तरली.

अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभव…
” MH- 12………, म्हणजे पुण्याच्या आहात ना तुम्ही ?” क्षणभर विचार करून इन्स्पेक्टर चारूशीलांचा पुढचा प्रश्न.

” मला वाटतं, ‘MH-12’ म्हणजे गाडी पुण्याची आहे एवढाच अर्थ होतो, नाही का इन्स्पेक्टर ? ” नेहाचा प्रतिप्रश्न.

इन्स्पेक्टर मोरे यांनी नेहा कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्या केतकीकडे सॉफ्ट टार्गेट म्हणुन पाहू लागल्या.

“तरी पण मला तुमच्या तोंडातुन ऐकायचं असेल तर..सावज बंदूकीच्या टप्यात आलं असताना बंदूक कोणावर झाडायाची हे मी ठरवणार की नाही ? इन्स्पेक्टर मोरे केतकी कडे पाहून कोड्यात म्हणाल्या.

काही न समजल्याने भांबावुन गेलेली केतकी आणखीनच बुजली.

“बरं मला सांगा तुमच्या गावाला ” MH- किती लिहतात ते ? केतकीकडे रोखून बघत इन्स्पेक्टर मोऱ्यांनी तिला विचारले.

“अं…म्हणजे?? केतकी पूर्ण गोंधळली.

एकसारखा केतकीवर दबाव आणण्याचा इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांचा प्रयत्न पाहून नेहाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अस्वस्थपणे खुर्चीच्या हातावर तिच्या बोटांची चळवळ चालु होती. मनात बंड ! केतकीच्या भोळेपणाचा चारूशिला मोरेंनी गैरफायदा घेऊ नये असं तिला मनोमन वाटत होतं. पण करणार काय ? नजर जमीनीवर स्थिर ठेवून तिचे कान दोघींच्या संवादात सामील झाले होते.

हतबल नेहा आणि फिरकी घेणाऱ्या इन्स्पेक्टर चारूशिला मोरेंना पाहून केतकी पुरती चक्रावली. तिच्या साध्या- भाबड्या स्वभावाला हे सारं नाट्य अजिबात उमजत नव्हतं. तिचं डोकं गरगरायाला लागलं होतं. कोमेजलेल्या चेहऱ्यावर नुकत्याच वाहून गेलेल्या अश्रुंच्या धारा समोरच्याचे हृदय हेलावुन सोडत होत्या. परंतु इन्स्पेक्टर मोऱे यांनी ह्याच साधेपणाला टार्गेट करत तिला फैलावर घेतले होते. केतकीच्या पाणावल्या डोळ्यातुन निरागसता उतू जाऊ लागली. आपल्या दोन्ही हातांनी डोळे पुसत केतकी बोलू लागली.

“मॅडम, प्लिज तुम्ही…असं कोड्यात बोलू नका, खुप गोंधळायला झालंय. ही असली प्रश्नाची सरबत्ती नाही झेपत मला. विश्वास ठेवा, मी तुम्हाला घडला प्रकार जशाच तस्सा सांगते” प्रसंगाला ठामपणे सामोरं जाण्याइतपत विश्वास डोळ्यात आता दिसु लागला.

“देशमुख, कबुलीजबाब लिहून घ्यायला या, जाधवबाई एक ग्लास पाणी आणा. इन्स्पेक्टर चारूशीला मोरे यांनी फर्मान सोडले.

अखेर केतकीने तोंड उघडलेच. आता नको तेच होणार या विचाराने चुळबुळणारी नेहा अधिकच खवळली. केतकीकडे आश्चर्याने पाहत तिने विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला.

“केतू !! ” नकारार्थी मान हलवत नेहा म्हणाली.

पण केतकीला बोलती करण्यामागचं महत्व जाणुन इन्स्पेक्टर मोऱ्यानी नेहाला हटकले.

“केतू चं झाल्यावर तुझं ही ऐकून घेऊया हं “

इन्स्पेक्टर मोऱ्यांच्या शालजोडीतुन मिळालेल्या चपराकेने नेहा निराश होऊन खिडकीबाहेर पाहत राहिली.

“आपण सांगत आहोत ते योग्य की अयोग्य?” या विचाराने बावचळलेल्या केतकीने क्षणभर मौनाचा आश्रय घेतला. शेवटी मनातुन काहीतरी पक्क करून निर्धाराने ती बोलू लागली.

“इन्स्पेक्टर, आम्ही दोघी पुण्यात MBA करतो. मी मुंबई वरून आले आहे आणि नेहा मुळची साताऱ्याची. पुण्यात आम्ही एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणुन राहतो…..सॉरी राहायचो. अधिक स्पष्टीकरणासाठी इन्स्पेक्टर मोऱ्यानी फक्त भुवया ताणल्या.

“राहायचो म्हणजे सध्याही आमचं सामान पुण्यात एका मैत्रीणीकडे ठेवलंय”. – केतकी

“मग सध्या कुठे राहता” जबाब लिहून घेणाऱ्या देशमुख बाईंनी विचारले.

“सध्या आम्हाला घरच नाही. म्ह्णूनच घराच्या शोधात आहोत.

“जुनं घर का सोडलं? – इन्स्पेक्टर मोरे

“घरमालकांनी घर विकलं आणि पुणे सोडून कायमचं वास्तव्य केलंय, म्हणुन मग आमची गैरसोय झाली.” – केतकीचा खुलासा.

” मग नवीन घर मिळायला काही अडचण? नाही म्हटलं घर शोधायचं सोडून तुम्ही इकडे भटकताय म्ह्णून विचारलं” – इन्स्पेक्टर.

“नवीन फ्लॅट साठी पैसे नाहीयेत” केतकीने तोंड पाडलं.

“पुण्यात फ्लॅट विकत घेणार आहात का ? – देशमुख बाई

“नाही भाडयानेच” – केतकी

“अगं बाई ..मग डिपॉजिट जास्त आहे का?- देशमुख बाई

” देशमुख !!! फालतू चौकश्या कशाला हव्यात ?? केस राहिली एकीकडे……..”

इन्स्पेक्टर मोरेनी खडसावले.

” खरंच डिपॉजिटचा प्रॉब्लेम आहे. आधीच्या घरमालकानी आम्हाला डिपॉजिट परत केलंच नाही” केतकी केविलवाणा चेहरा करत म्हणाली.

” का बरं ???? इन्स्पेक्टर मोरे नी आता रस घेतला.

” का ..कारण आम्ही सौऱ्याची…….” बोलता बोलता केतकी अचानक गप्प झाली. एवढ्या वेळ शांत बसलेल्या नेहा कडे तिने नजर फिरवली. नेहाच्या मनातील चडफड, इन्स्पेक्टर मोऱ्यानी दिलेली उडवाउडवीची उत्तरं या सगळ्यांच गमक आता कुठे कळून चुकलं. पुन्हा टचकन तिच्या डोळ्यांत पाणी तरळंल. ‘ नेहाचं ऐकून गप्पच बसणं योग्य होतं’ हे आता कुठे मनोमन तिला पटलं.

“सौऱ्या ?? कोण सौऱ्या ?? त्याचं काय ? इन्स्पेक्टरांनी पुन्हा केतकीला धरले. मात्र मान खाली घालुन केतकी गप्प बसुन राहिली.

“केतकी, कोण सौऱ्या ? मी काय विचारते? मला उत्तर हवयं केतकी.” इन्स्पेक्टर मोरे पुन्हा केतकीला बोलते करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण व्यर्थ ! मुकपणे ती अश्रु ढाळत होती. जणू नेहाच्या बोलण्याची ती वाट पाहत होती.

दरवेळी प्रमाणे याही वेळी हरत आलेला डाव नेहाच्या हाती सोपवुन आता केतकी बाजूला झाली. सवयीनं जिंकण्याच्या सर्व चाली जणू नेहाला ठाऊक होत्या. अखेर आता नेहाला डाव हाती घ्यायची वेळ आली.

एवढ्या वेळ गप्प बसलेल्या नेहाने हतबळ होऊन रडणाऱ्या आपल्या मैत्रिणीकडे पाहिले. शांतपणाने मनाशी विचार केला. सगळ्या महिला पोलिसांच्या नजरा तिच्या कडेच वळल्या होत्या. इन्स्पेक्टर चारूशिला मोरे च्या नजरेला तिने एकवार नजर भिडवली. मग पुन्हा एकदा खिडकीबाहेर पाहिले. नंतर अचानक ती स्वतः शीच हसू लागली. तिच्या चमत्कारिक हसण्याने वातावरण आणखीच तणावपूर्ण झाले. गोंधळलेल्या इन्स्पेक्टर मोरे कडे पाहत तिने सरळ सवाल केला.

“इन्स्पेक्टर, असल्या खाजगी फाटकळ- फुटकळ वादांना ‘वाचा फोडण्याचे काम’ कशाला करता ? हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, आम्ही आणि सौऱ्या मिळून तो सोडवू.” नेहाच्या उद्धट बोलण्याने इन्स्पेक्टर मोऱ्यांचा पारा चढला. चवताळून त्यांनी नेहाला फैलावर धरले

“काय गं ..तुला काय खाजगी मामला वाटतो हा. तुमच्याविरुद्ध ठसठशीत पुऱाव्यासह अख्खी केस उभी राहिली….आणि काय ग ए..तू मला ‘माझ काम काय’ शिकवतेस काय ?..थांब, तुला या केस मधून कोण सोडवतंय तेच बघते. याद राख, इथुन पुढे तोंड वर करून एक शब्द जरी बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे.” इन्स्पेक्टर चारूशिला मोऱ्यांनी नेहाला चांगलीच तंबी दिली.

इन्स्पेक्टर चारूशीला मोरेंच्या अचानक झालेल्या हल्ल्याने केतकीचा धीरच चेपला. ती मनात विचार करू लागली.

“या, सगळ्यांला मीच जबाबदार आहे. माझ्याच मुळे बिचाऱ्या नेहाला एवढा ओरडा खावा लागला. जाऊ दे. काय होईल ते होवो. बस्स आता सगळ सांगुनच टाकते.

पुन्हा एकदा मौन सोडून केतकीने सांगायला सुरवात केली. तशा देशमुखबाई जबाब पुढे लिहु लागल्या.

आमचा अगदी साधा सरळ सौदा झाला होता. आमच्या दोघींचा सौरभशी ठरलेला. सौरभ – सौरभ कुलकर्णी. आमच्या घरमालकांचा मुलगा. आम्ही कुलकर्ण्याकडे पेंइग गेस्ट म्हणुन राहत असल्याने रोज त्याच्याशी गाठ पडे. सौऱ्या तसा एकदमच चंपू ! केतकीच्या वाक्य मध्येच तोडत जबाब लिहून घेणाऱ्या देशमुखबाई नकळत म्हणाल्या.

“चंपू?”

त्यांच्या या अनपेक्षित विनोदाने वातावरण जरा निवळले. इन्स्पेक्टर मोरे नी मात्र वातावरणाचे गांभीर्य आपल्या घसा खाकरण्याने कायम ठेवले.

“अहो, चंपू म्हणजे बावळट हो” केतकीने खुलासा केला. ती पुढे सांगू लागली.

” तर त्या चंपू सौऱ्याला साधी गाडी सुद्धा चालवता येत नव्हती. आपल्या एकुलत्या एका मुलासाठी कुलकर्णी काका- काकु नी साऱ्या सुखसोयी करून ठेवल्या आहेत. पण हा एकदम नेभळट निघाला. तीन वर्ष झालीयेत ह्याला गाडी घेऊन. पण हा चालवेल तर शपथ! बरं आम्ही गेल्या वर्षी पासून राहतो त्यांच्याकडे, तेव्हापासून आमचं त्यांच्याशी सुत जुळलय. दोघेही आम्हाला मुलीच मानत होत्या. त्यामुळे तो सौऱ्या आमच्यावर खुप जळायचा. त्यातच काका- काकु आम्हाला म्हणाले.” आमच्या सौरभसाठी घेतलेली गाडी पडून राहण्यापेक्षा तुम्ही वापरत जा.” तेव्हापासून ही एंटायसर आमच्याकडेच आहे. सौऱ्याचा पार तिळपापड झालाय. पण बिचारा करणार काय ? त्याला कुठे ती चालवता येत होती! मग तेव्हापासून आम्हा दोघींची आणि त्याची बरीच फाटकळ- फूटकळ भांडण व्हायची. पण शेवटी त्याने इंगा दाखवलाच. काकांची कायमस्वरूपी गोव्याला बदली झाली. म्हंणून ते सगळे नुकतेच गोव्याला शिफ्ट झाले. पुण्यातली घर विकल्याने आम्हाला ते कायमचे सोडावेच लागले. या सगळ्या शिफ्टिंग, पोस्टिंग च्या धांदलीत काकांनी सगळ्या व्यवहाराची जबाबदारी सौऱ्यावर सोपवली. मग काय त्यानेच डाव साधला. डिपॉजिट आता देतो, उद्या देतो करत करत गोव्याला पोचला. अर्थात गाडी आमच्याकडे देऊन मग गोव्याला पोहचल्यावर म्हणाला की , डिपॉजिट नक्की देतो पण आधी गाडी परत द्या.”

“आता तुम्हीच सांगा, आम्ही काय त्याची गाडी घेऊन कुठे पळून जाणार होतो काय? पण नाही. तो ऐकतच नाही. तेवढ्यासाठी आमचं डिपॉजिट खोळंबलं. काका- काकुंची मदत घ्यावी म्हटलं तर ते दोघेही ट्रेनिंगसाठी माॅरीशसला गेले आहेत. तेवढा वेळ थांबणं आम्हाला शक्य नाही. डिपॉजिटसाठी आमच्या घरीहुन आर्थिक मदत येण्यास काहीच अडचण नाही. पण शेवटी केव्हातरी त्याला गाडी गोव्याला नेवून द्यावीच लागणार होती. म्हणुन एखादी झक्कास ऍडव्हेंचर ट्रिपही होईल या उद्देशाने गोव्याला इथे गाडीने आलोय. आणि तो सौऱ्या ..गाडी चोरल्याची खोटी तक्रार करून आम्हाला या केस मध्ये अडकवू पाहतोय, पण मॅडम आम्ही गाडी चोरी नाही केली. सौऱ्या आमचा बदला घेतोय, प्लिज विश्वास ठेवा” केतकी ने इन्स्पेक्टर मोरे समोर विनवण्या करू लागली.

“किती गुणवान पोरी आहात गं तुम्ही, तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवेल?? इन्स्पेक्टर चारुशीला मोरे अजूनही केतकी कडे संशयाने पाहत होत्या.

“नाही मॅडम, मी खोटं नाही बोलत.” केतकी केविलवाणा चेहऱा करत म्हणाली.

“मग अकॅसिडेन्ट चा किस्सा अगदी जाणूनबुजून लपवला दिसतोय. – इन्स्पेक्टर मोरे.

मघापासून मूग गिळून बसलेली नेहाने चमकून इन्स्पेक्टर मोरे कडे पाहिले. काहीही न उमजुन दोघीही आश्चर्याने म्हणाल्या.

“अकॅसिडेन्ट??? कोणता अकॅसिडेन्ट??”

“उगीच भोळे- भाबडे चेहरे करून मला फसवण्याने काही होणार नाही. जरा नीट आठवून बघा. परवा कोलेगावच्या पुलावरचा असिसिडेन्ट आठवतोय का? तुमच्या गाडीमुळे अपघातात मरण पावलेल्या इसमाला तिथेच रस्त्यात सोडून निघुन गेलात. आठवत नाहीये का काहीच? इन्स्पेक्टरांनी आवाज चढवून विचारलं.

“इन्स्पेक्टर, हे जरा अती होतंय हा. एकतर बिनकामाचा एवढा वेळ खाल्ला. दमदाटी करून गप्प काय बसवलं. आणि आता हे बिनबुडाचे आरोपही करताय.” नेहा चिडून म्हणाली.

“मिस. नेहा तोंड सांभाळून बोल. मी चारूशिला मोरे कधीही कोणावरही पुराव्याविना आरोप करत नाही. परवा रात्री कोलेगावच्या पुलावर अपघातात मृत झालेल्या व्यक्तिच्या मृतदेहाजवळ तुमच्या गाडीची ही नंबर प्लेट सापडली. मृतदेहाचा पोस्टमॉर्टम चालू आहे. पण प्राथमिक अहवालानुसार कोणत्यातरी अज्ञात वाहनाच्या जबरदस्त धडकेने अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण जवळ सापडलेल्या नंबर प्लेटनुसार जवळपासच्या परिसरात चौकशी केली असता तुमच्याच गाडीची पुढची नंबर प्लेट आणि मागची नंबर प्लेट ( जी अपघात स्थळी सापडली) या एकमेकींशी जुळल्या आहेत, म्हणुन तुम्हाला आरोपी म्ह्णून अटक करणं माझं कर्तव्य नाही का ?

“इन्स्पेक्टर तुमचा गैरसमज होतोय, आमच्या हातून असा कोणताही अपघात झालेला नाही. केतकी काकुळतीला येऊन म्हणाली.

काही आठवल्यासारखं झालं म्ह्णून नेहा म्हणाली.

“एक मिनिट, आठवलं काल रात्री दिवसभराच्या थकव्यानंतर आम्ही कोलेगावच्या पुलावर गाडी पार्क करून खाली पाण्याच्या प्रवाहात फ्रेश होण्यासाठी गेलो होतो. तेव्हाच पुलावर कसलासा जोरदार आवाज आला. खुप मोठा होता तो. आवाज ऐकताच आम्ही धावतच चढण चढून पुलावर गेलो. तर तिथे अंधारात कसलीशी हालचाल चालु होती.

“कोण आहे ? असा आवाज देताच कुणीतरी पटकन कुठेतरी वर चढल्याचे पुसटश्या अंधारात मला जाणवले. लागलीच खुप सारा धुराळा उडवत एक ट्रक सूरु झाला. आणि रो..रो करत पसार झाला. नक्की काय ते बघण्यासाठी मी अंधारात चाचपडत होते तर चांदण्या प्रकाशात मला आडवी पडलेली एंटायसर दिसली. तिची अशी दुरावस्था करणाऱ्या ट्रकचा मला भयंकर राग आला. म्हणुन त्याचा पाठलाग करण्याचा मी प्रयत्न केला आणि धांदलीत पुलावर नेमकं काय झालं हे बघायचं राहुन गेलं.” नेहा ने मोठ्या हुशारीने खुलासा केला आणि मोठ्या आशेने ती इन्स्पेक्टर मोरे कडे पाहू लागली.

तेवढ्यात इन्स्पेक्टर देसाई आणि नाईक यांनी पोलीस चौकीत प्रवेश केला. त्यांच्या हातात चामडयाची मोठी बॅग होती आणि हातात कसलासा कागद होता. नाईक इन्स्पेक्टर मोरेंच्या कानात येऊन काहीतरी कुजबुजल्या.

इन्स्पेक्टर मोरे दोघींकडे वळल्या आणि स्वतःशीच हसत टाळ्या वाजवत त्या नेहाला म्हणाल्या,” व्वा!! बहोत खूब ! मला खरंच माहिती नव्हतं, की एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये सुद्धा तू एवढी अद्भुत कथा रचू शकू शकते. मानायला हवं तुला ग्रेट !!” तुच्छतेने नेहाकडे पाहत इन्स्पेक्टर चारुशीला मोरेनी तिची अशी बोळवण केली.

मॅडम, खरंच नेहा खोटं बोलत नाही आहे. मी सुद्धा त्या रात्री हेच पाहिलंय. विश्वास ठेवा. आम्ही खरं सांगतोय. आम्ही निर्दोष आहोत” केतकी सुद्धा मिनतवाऱ्या करू लागली.

“निर्दोष ??? इन्स्पेक्टर देसाई यांनी कुत्सित हसत काॅकैन च्या दोन पिशव्या टेबलावर ठेवल्या. आणि मोरे मॅडमना ते पुढे सांगू लागले.

“मॅडम ह्यांच्या गाडीच्या मागच्या डिकीत ह्या दोन काॅकैनच्या दोन पिशव्या सापडल्यात. आणि ह्यासारखे सेम ड्रुग्स त्या निग्रोच्या रूममध्ये मिळाले आहे.

“ड्रुग्स??? आता पर्यंत ‘ड्रुग्स आणि निग्रो’ हे शब्द कानावर पडताच नेहा आणि केतकीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

“रूम मध्ये अजून काही सापडलं आहे का? इन्स्पेक्टर मोरे यांनी देसाई आणि नाईक यांकडे चौकशी करू लागल्या.

“हो, मॅडम ह्या दोघी त्या निग्रो बरोबरच दोन दिवस फिरत होत्या असं हॉटेल स्टाफ कडुन समजलं आणि त्या निग्रोच्या बॅगेतुन ड्रुग्स बरोबर हे सुद्धा सापडलंय.” नाईकांनी बॅगेतुन एक गुलाबी रंगाची लेडीज अंडरवेयर झुरळं बाहेर काढावं तशी बाहेर काढली. इन्स्पेक्टर मोरे यांनी दांड्यामध्ये चड्डीला अडकवून नेहा आणि केतकीच्या समोर धरले. इन्स्पेक्टर देसाई तेथून लगेच बाजूला झाले.

“ही दोघीं पैकी कोणाची आहे सांगू शकाल?”

नेहा आणि केतकी निरखून त्या चड्डी कडे पाहू लागल्या.

“ही तर नेहाची आहे” केतकी चड्डीची ओळख पट्ताच लगेच बोलुन गेली. तशी नेहाने केतकीकडे चमकून पाहिले.

“व्हेरी गुड , केतकी !! मग तू ह्याला तर नक्कीच ओळखत असशील” नाईकांकडुन स्केच घेऊन त्यांनी दोघींच्या समोर धरले. ” हा माणूस तर तुमचा तो सौऱ्या नाही ना?? जरा नीट बघा.

आपल्या गाडीत ड्रुग्स कुठून आले?? नेहाचे अंतवस्त्र जेम्सच्या बॅगेत कुठून आले?? कोणीतरी जाणूनबुजून आपल्याला फसवत आहे. आपण आता मोठ्या सकंटात अडकले जात आहोत याची नेहाला कल्पना आली होती. समोर जेम्सचे स्केच होते. त्याला न ओळखून चालणार नव्हते. कारण हॉटेलच्या सर्वच स्टाफनी जेम्स बरोबर फिरताना दोघीना पाहिले होते.

“मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जेम्स आम्हाला हॉटेल मध्येच भेटला होता. आणि ह्या ड्रुग्सचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. कोणीतरी आम्हाला ह्या केस मध्ये फसवत आहेत. प्लिज मॅडम, आम्हाला खरंच ह्यामधलं काहीच माहिती नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन नेहा आता शांतपणे बोलत होती.

“जाधवबाई, यांना पहिलं आत टाका. असल्या धूतल्या तांदळाला एकदा शिजवून काढायला हवं. मग बघा कार्ट्या कसं शिट्टया झाल्यासारख्या धडाधड बोलताहेत ते” इन्स्पेक्टर मोरे तावातावाने बोलत पुढल्या कामाला लागल्या.

जाधवबाईनी धाकदपटशा दाखवीत त्या दोघीना एकदाचे लॉकअप केले. केतकीचे रडून रडून डोळे सुजले. नेहा घडल्या प्रकाराने बावचळुन गेली होती. केतकीला कसा धीर द्यावा हेही तिला कळेना. एक मर्डर केस आणि दुसरी ड्रुग्स केस अशा दोन केस मध्ये त्या दोघी गुंतल्या गेल्या होत्या. जेम्स ड्रुग्स प्रकरण हे तर तिच्या समजण्यापलीकडे होते. मनाशी काहीतरी आराखडे बांधत केतकीला कुशीत घेऊन तिने शांत केले.

इकडे इन्स्पेक्टर मोऱ्याची धावपळ सुरु झाली. एव्हाना पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता. त्याच्यावर हलकेच नजर टाकत इन्स्पेक्टरांची कामानिमित्त फोना फोनी सुरु होती. जेम्सची ओळख पटल्याने हे मोठे ड्रुग्स रॅकेट हातात लागण्याची शक्यता होती. असे इन्स्पेक्टर चारुशीला यांना वाटले. तोवर इन्स्पेक्टर देसाई आणि नाईक यांनी गाडीचा रिपोर्ट आणि हॉटेल मधले सीसीटेव फुटेज त्यांच्यासमोर सादर केले. एकेक निष्कर्षाचा मिळता- जुळता पडताळा घेताना त्यांच्या भुवया आक्रसत होत्या. एकंदरीत त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कुठल्याशा कामासाठी घटनास्थळी पोहोचवायचे असल्याने मोजकी पोलीस फौज घेऊन त्यांनी जिप काढली आणि त्या निघाल्या. निघताना त्यांनी जाधवबाईना सांगितले,

“त्या दोघींच्या घरी कळवायचं राहिलय, ड्रुग्स केस असल्याने जामीन तर मुश्किल आहे. तरी त्यांना जामीनासाठी घरी कळवा म्हणावं मी येतेय एका तासाभरात”.

असं म्हणत इन्स्पेक्टर मोरे जीप मध्ये बसल्यादेखील सोबतच्या महिला पोलिसाव्यतिरिक्त दोन टू- व्हीलरधारी शिपाईही अन्य धावपळीसाठी त्यांनी सोबत घेतले. नेहा अगदी निवांतपणे त्यांच्या या धांदलीमध्ये निरीक्षण करीत बसली होती. तिला काल रात्री झालेला प्रकार केतकीकडुन जाणून घ्यायचा होता. जेम्सबरोबर रात्री आपण कुठे कुठे गेलो हे आठवण्याचा प्रयत्न करत होती.

क्रमश:

4/5 - (2 votes)

1 thought on “ब्लॅक इन गोवा भाग- ६”

Leave a Comment

error: Content is protected !!