“केतु, काय पण म्हण, जेम्सचा दांडा सॉलिड होता यार” लॉक अप मध्ये भिंतीला पाठ टेकवत नेहा म्हणाली.
“ये बाई, त्या दांड्यामुळेच आता पोलीसांचे दांडके खायाची आपल्यावर पाळी आली आहे.” केतकी जरा चिडूनच म्हणाली.
“हो यार, नशीबच गांडू आहे आपलं. पहिले त्या सौऱ्याने आपल्याला गंडवल, नंतर तो ट्रक ड्राइवर त्या माणसाला उडवून गेला आणि नाव आपल्यावर आलं. आता तर काय आपण ड्रुग्स डीलर सुद्धा झालोय.”
आदल्या दिवशीच्या रात्रीचा उजाळा देत केतकी आणि नेहा आपल्या नशिबाला दोष देत बसल्या होत्या. दोघीनी मजा तर मारली होती. पण त्याचा आपल्याला एवढा भुदंड भोगायला लागेल हे त्याला माहिती नव्हते. नेहाला मात्र हळूहळू सर्व घटनाक्रम लक्षात आले होते. तेवढ्यात तिला काहीतरी आठवले.
“आयला केतू, तुला बोलले होते ना त्या हॉटेलच्या मालकीण बाई ला मी कुठे तरी पाहिलंय म्ह्णून” नेहा केतकीला उद्देशून म्हणाली.
“अगं त्याने इथे काय फरक पडणार आहे. ती गोव्यातली नामी व्यक्ती असणार, हॉटेल मध्येच पाहिली असशील तिला तू” केतकीला सुटण्याचा काहीच मार्ग दिसत नव्हता. आपण पुरते फसलो आहोत तिला कळून चुकले होते.
“अगं हा आपल्या विरुद्ध रचलेला प्लॅन आहे, तुला कळत कस नाही” नेहा तिला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होती.
“तुला नक्की काय म्हणायचय नीट सांग मला” केतकी सुद्धा नेहाचे बोलणे ऐकण्यास आतुर झाली.
“काल रात्री मी आणि जेम्स हॉटेल आलो वर तेव्हा ती बाई रिस्पनीस्ट काउंटर ला होती. तिनेच आम्हाला जेम्सच्या रूमची चावी दिली. नेहा हळू आवाजात केतकी बरोबर बोलत होती.
“काही काय, मालकीण रिसेप्नीस्ट काउंटर ला कशी असेल, दुसरं कोणी तरी असेल, काल रात्री तुला शुद्ध तरी होती का” केतकीला नेहाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. कारण नेहा कालचा अवतार असा होता की तिच्या बघण्यात काही तरी चुकी झाली असेल असे तिला वाटले.
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभव…
“काही तरी लोचा आहे केतू, आपल्याला ह्या सर्वाचा छडा लावला पाहिजे, नाही तर फुकटच्या आपण दोघी लटकू” नेहा आपल्या तल्लख मेंदू ला चालना देऊ लागली.
नेहाने अगदी निवांतपणे आपल्या आजूबाजूच्या गोष्टीचे निरीक्षण करू लागली. इन्स्पेक्टर मोरे चोकीतुन बाहेर जाताच उरले सुरले महिला पोलीस सुस्तावल्या. त्या पेंगुरलेल्या वातावरणात नेहा मात्र टक्क जागी होती. निवांतपणे डबा खाणाऱ्या जाधव बाईना तिने हाक मारली.
“मावशी…अहो मावशी जरा इकडे या ना “
“कार्टी नीट काय जेवुही देत नाही” पुटपुटत जाधवबाई तिच्या जवळ आल्या.
“मावशी मला जामीन हवाय” नेहा अदबीने त्यांना म्हणाली.
“मग घे ना, मी काय करू” जाधवबाई कंटाळवाण्या स्वरात म्हणाल्या.
“अहो, म्हणजे आम्हाला घरी कळवू तर द्या” नेहा पुन्हा त्यांना समजावत म्हणाली.
“मग कळव. मी कुठे अडवलंय ? जेवु दे नीट मला असं म्हणत त्या बाई पुन्हा एकदा आवडीने जेवायला बसल्या.
“मावशी मला जरा घरी फोन करू दे ना” नेहा पुन्हा अजीजने म्हणाली.
“श्शी! काय कटकट आहे” तणतणत जाधवबाईनी लॉक उघडले.
“केत्या, चल घरी फोन लावु” नेहा केतकीला हातानी उठवत म्हणाली.
“अगं पण आत्याला काय सांगणार? आपण अटकेत आहे म्ह्णून? केतकीचा दोन्ही डोळ्यातून अश्रु वाहू लागले.
“तू फक्त माझ्यासोबत चल” नेहा ने केतकीची समजून काढली.
जाधवबाई डब्यावर ताव मारण्यात मग्न पाहून नेहा केतकीच्या कानात काहीतरी कुजबुजली. तिच्या बोलण्याने आश्चर्यचकित होऊन केतकी तिच्याकडे डोळे विस्फारुन पाहू लागली. नेहा लॉक अपचे दार उघडून बाहेर पडणार तोच केतकीने तिला मागे खेचले. हाताने तिच्या दोन्ही खांद्याना घट्ट धरत तिच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवली. नेहाने पुन्हा हलक्या आवाजात काहीतरी पुटपुटत तिची समजुत काढली. त्यासरशी केतकीच्या डोळ्यातुन गंगा यमुना वाहू लागल्या. नेहाने तिचे डोळे पुसत प्रेमभरांने तिला मिठी मारली. क्षणभर दोघींना अश्रु अनावर झाले. तेवढ्यात त्यांचे गुळपीठ पहात जाधवबाई मोठ्या आवाजात म्हणाल्या.
“ओ लवबर्डस् इन्स्पेक्टर बाई येण्याआधी घरी फोन उरकून घ्या.
दोघी हलकेच वाकून लॉक अप बाहेर आल्या. टेबलाजवळ जाऊन वाहत्या डोळ्यांनी रिसिव्हर उचलला. नेहाकडे पाहतच तिने फोन लावला. पलीकडुन आत्याचा आवाज आला. पण केतकीचे तिच्याकडे लक्षच नव्हते. नेहाने डोळ्याने तिला काहीतरी खुणवले आणि लक्षपूर्वक ती आत्याशी बोलू लागली.
“आतु..मी पणजी पोलीस स्टेशन मधून बोलत आहे.
“पणजी पोलीस स्टेशन ? तू तिथे केव्हा पोहचलीस ? आत्याने प्रश्न केला.
आत्याच्या ह्या चोकशीने केतकीला रडु कोसळलं.
“केतकी, बेटा बरी आहेस ना तू? बेटा रडतेस का? आत्या काळजीने विचारु लागली.
“आतु, आतु…अगं मला पोलीसांनी अटक केलंय गं, तुझी शपथ ..आम्ही काही नाही केलंय गं, ” केतकीचा बांध फुटला. पुढचं तिला काहीच बोलवेना. ती हमसुन हमसुन रडु लागली.
तिच्या बोलण्याकडे पोलीस चौकीतील सगळ्यांचे लक्ष लागले. हृदय पिळवणार तिचं बोलणं ऐकून सगळ्यांचच काळीज पिळवटुन निघालं. जाधवबाईंच्या सोबत बसलेल्या आणखी एका महिला पोलीसाचा घास हातातच अडकला. करूणेने त्या केतकीकडे पाहत बसल्या.
इकडे आत्याच्या प्रश्नानी उर दाटून आलेल्या केतकी ला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण जात होते. परंतु रडत रडत तिने सारा वृतांत आत्याला सांगितला. जवळपास पाच मिनिटे फोनवर काढल्यानंतर केतकीने संभाषण थांबवले. नंतर सावकाश पावले टाकत लॉक अप मध्ये येऊन डोळे चोळत बसली.
घडल्या प्रकाराने पोलीस चोकीतिल वातावरण जरा भावुक झाले होते. इतक्यात डबा बंद करून ढेकर देत जाधवबाईनी तिला मोठ्यांदा सांगितले.
“तुझ्या मैत्रीणीलाही लवकर फोन उरकून घ्यायला सांग. पाणी पिताना केतकीकडे लक्ष देत त्यांनी तिला न्याहळले. जरा इकडे तिकडे नजर टाकत त्या काहीतरी शोधू लागल्या. आणि…आणि अचानक विंचू चावावा तश्या त्या ओरडल्या.
“अहो देशमुख, ती दुसरी कार्टी कुठंय ?
त्यासरशी सगळ्यांनी चोकीभर नजर टाकली. दोघीजणी बाहेरही पळत गेल्या. सगळीकडे शोध घेतला पण नेहा कुठेच दिसेना. आता मात्र सगळ्यांचं धाबं दणाणलं. सर्वत्र धावाधाव करूनही नेहाचा मागमुस लागेना. आपल्या हातावर तुरी देऊन नेहा सटकली हे लक्षात येताच साऱे पोलीस अधिकारी ‘आता काय’ या नजरेने एकमेकींकडे पाहू लागल्या.
सारा प्रकार लक्षात येताच जाधवबाईनी लॉक अप कडे धाव घेतली. केतकी गुडघ्यात डोकं खूपसुन रडत होती. जाधवबाईनी अक्षरशः तिच्या अंगावर झडप घेतली. खासकन तिचे केस ओढुन तिला विचारले.
“बोल तुझी मैत्रीण कुठे आहे?”
” नेहा? कुठंय नेहा ? केतकीने तितक्याच कुतूहलाचे भाव चेहऱ्यावर पसरवत विचारले.
“बास्स, आता नाटकं एकदम बंद मला काय खुळी समजलीस का गं ? दोघींच एवढं गुळपीठ का चालू होतं मघाशी ते आताशी समजलं मला. बोल कुठे पळाली ती” जाधवबाईनी केतकीचा छळ मांडला.
पण केतकी मात्र घाबरून आणखीनच रडु लागली.
“कार्टी इब्ल्सिच होती. माझच चुकलं. आता ती मोरेबाई मला अक्खी खाऊन टाकेल.” जाधव बाई स्वतःलाच दोष देऊ लागल्या.
” ए चित्रा, इन्स्पेक्टरीना कळव, नाहीतर कच्ची खाईल ती मला.
अहो बाई, तुम्हीच कळवा, आम्ही नाही कळवणार जो कळवेल , त्याला काय मॅडम सोडतील का ? चित्राने हात झटकले.
“पण तुम्ही सगळ्याजणी झोपल्या होता का ती कार्टी पळून जाईपर्यंत ? साधे दोन घास सुखाने जेवुही देत नाही.” बोटं मोडत जाधवबाईंनी रिसिव्हर हातात घेतला. आणि मोठ्या धीराने त्यांनी इन्स्पेक्टर चारुशीला मोरेंना घडला प्रकार कळवला. पलीकडचे फायरिंग ऐकून तणतणत त्यांनी फोन आपटला.
“काय म्हणाल्या मॅडम? चित्राने खोचकपणे विचारले.
तशा जाधवबाई सुद्धा आवाज चढवून म्हणाल्या.
“काही नाही..आता प्रमोशनच करून टाकते एकेकीचं असं म्हणाल्या इन्स्पेक्टर बाई” एवढ्या तणावातही चोकीत खसखस पिकली.
इन्स्पेक्टर मोरे ह्यांनी तात्काळ गाडी बाजूला घ्यायला सांगितली. जाधवबाईची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
“काय झालं मॅडम ?”
“पोलीस चौकीतुन जाधवबाईचा फोन आला होता. पाचच मिनिटे झाली आहेत. त्या दोन पोरींपैकी एक टारगट मुलगी अपल्याला गुंगारा देऊन पळाली आहे. लगेच लांब नाही गेली असणार. तेव्हा नाईक ..इन्स्पेक्टर मोरे पुढली सेटिंग लावु लागल्या.
“येस मॅडम” – नाईक बाई
” तुम्ही इथून उत्तर भाग- वर्णा, शिरोली, बांडोळी छानुन काढा. मी तिथल्या ठाण्यावर निरोप देऊन नाका- बंदी करायला लावते.
“देसाई तुम्ही बांबोलिन पासून चिंबेल पर्यंत शोध घ्या. पाटील तुम्ही माजोर्डा, कोलवा ते मडगाव चा पट्टा पिंजून काढा.
मी आपल्या चौकीत जाऊन मदतीसाठी आणखी फौज पाठवून देते. शक्य तितक्या घाईने आपली ठिकाणं गाठा आणि वाटल्यास स्थानिक लोकांच्या मदतीने त्या पोरीचा शोध घ्या. चला जा. इन्स्पेक्टर मोरे यांनी जणू नेहाच्या विकेटची फिल्डिंग लावली.
पणजी पोलीस चोकीत आल्या आल्या इन्स्पेक्टर मोरेनी पहिल्यांदा नाकाबंदी साठी फर्मान काढले. नंतर जाधवबाई आणि इतर सर्व महिला पोलीसांना चांगलेच फैलावर घेतले. इथे त्यांनी लावलेल्या व्यवस्थाप्रमाणे नेहाचा कसून शोध सुरु झाला.
देसाईनी रस्त्यावरच्या सर्व गाड्या तपासल्या. प्रत्येक बस मध्ये जाऊन चोकशी केली. प्रत्येक कंडक्टर ला सांगुन ठेवले. ‘एखादी गोरीपान, कुरळ्या केसाची चॉकलेटी डोळ्याची, बडबडी, वात्रट, शहरी कपडे घातलेली मुलगी जर कुठे दिसली तर ताबडतोब आधी पोलिसांना कळवा.
फौजदार नाईकबाईंनी टू- व्हिलर आणखी एक महिला पोलीसांना सोबत घेऊन नेमून दिलेल्या सर्व वाड्या, मंदिरे, चर्च शाळा शोधून काढण्यास सुरवात केली.
पाटीलबाईंनी ग्रामस्था बरोबर सर्व वस्त्यां, बिचवर जाऊन बघितले.
ठेले बाईंनी सर्व किल्ले, डोंगर कपाऱ्या तुडवल्या
नाकाबंदी मुळे सगळा प्रदेश पिंजून काढणे शक्य झाले.
मात्र सायंकाळ झाली तरी कुणाच्याच हाताला नेहा काय लागली नाही. कुठे गेली असेल ही मुलगी ? या अज्ञात परिसरात तिला काय झाले तर त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाणार. तिच्यावर अजून गुन्हा सुद्धा सिद्ध झाला नव्हता. या चिंतेने इन्स्पेक्टर चारुशीला मोरे अस्वस्थ होत्या.
सूर्य मावळला तसा सारा शोधही तसा थंडावला. कुठूनही नेहाची खबर मिळेना. सगळीकडे फोन लावुन झाले. अखेर हताश होऊन इन्स्पेक्टर चारुशीला मोरेनी कमिशनरना फोनवरून हा दुर्दैवी वृत्तांत सांगितला. कमिशनरच्या नाराजीने इन्स्पेक्टर मोरे अस्वस्थ झाल्या. नेमून दिलेला प्रदेश पिंजून काही महिला पोलीस नुकत्याच चौकीत परतल्या होत्या. इन्स्पेक्टर मोरे यांनी त्यांच्यावरही यथेच्छ तोंडसुख घेतले.
काही सुचेना म्हणुन इन्स्पेक्टर मोरे केबिन मध्ये येर- झाऱ्या घालत होत्या. इतर सर्व महिला पोलीस त्यांच्या कडे पाहत गप्प उभ्या होत्या. पोलीस चोकीत पंख्याशिवाय इतर कशाचही आवाज येत नव्हता. येर- झाऱ्या घालूनही काही सुचत नसल्याने इन्स्पेक्टर मोरे खुर्चीत डोकं धरून बसल्या. त्यांच लक्ष नाही पाहू जाधवबाई आणि चित्रा यांच्या कसल्यातरी आपापसात खाणाखुणा सुरु होत्या. अखेर धीर धरून जाधवबाई इन्स्पेक्टर मोरे जवळ आल्या. आणि हळूच त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटल्या. चमकून इन्स्पेक्टर मोरे यांनी वर पाहिले. जरा हायस वाटून त्या म्हणाल्या.
“अस्स, आणि हे तुम्ही मला आता सांगताय?
“तस नाही मॅडम, खरंतर कधीपासून सांगायच होतं, पण तुमचा पारा चढला होता ना, एवढा चढला होता ना की…. ” इन्स्पेक्टर मोरेची त्रासिक नजर आणखी तिरकस होऊन आपला वेढ घेत आहे हे कळल्यावर जाधवबाईनी जीभ चावली.
इन्स्पेक्टर मोरे केतकीच्या लॉक अप जवळ पोचल्या. तोंड पाडून पडलेल्या केतकीने भितभीतच त्यांच्याकडे पाहिले. जाधवबाईनी कुलूप काढले आणि कडी उघडली. इन्स्पेक्टर मोरे दार उघडत आत गेल्या.
आपल्याला पाहून गाळण उडालेल्या केतकीला पाहताना त्यांना किंचित हसू फुटले. शांतपणे दोन क्षण तिच्यावर स्थिर ठेवून त्यानी तिला उद्देशून बोलायला सुरवात केली.
” च्च…च्च…च्च…च्च्…च्च बिचारी गं, तुझी मैत्रीण टाकुन गेली का तुला ? अशी कशी गं तुझी मैत्रीण ? तोफेच्या तोंडी असं कधी एकटी- दुकटीला सोडतात का बरं ? अं? खोट्या प्रेमाने केतकीला थोपटत त्या तिची कीव करू लागल्या.
” मॅडम प्लिज मला मारू नका, मला खरंच माहिती नाही नेहा कुठे आहे ते.”
“तुला माहिती नाही तर आणखी कोणाला माहित आहे ? इन्स्पेक्टर मोरे यांनी तिला दरडावुन विचारले
“मला काहीच माहिती नाही” केतकी रडु लागली.
खसकन तिचे केस ओढत तिच्यावर त्या खेकसल्या..
“सांग हा पळण्याचा प्लॅन नक्की कोणाचा होता? त्या टारगट नेहा ने ठरवलं ना सगळं? बोल ना ? ती त्या जेम्स लाच भेटायला गेलीय ना ?
“नाही, मला खरंच माहित नाही. मी आत्याला फोन करेपर्यंत ती कशी काय पळाली ते अजिबात समजलं नाही. मला जर माहिती असत ना की पळून जाणार आहे मी तिला नक्कीच अडवलं असतं. मला समजल नाहीये की नेहा मला एकटीला टाकुन कशी पळून गेली. केतकीच्या निरागस डोळ्यातून भाबडेपणा उतू जात होता.
“चूप!! खोटारडी, जाधवबाईंनी पाहिलंय तुम्हाला एकमेकींच्या समंतीने प्लॅन ठरवताना. तुझ्या भोळ्या भाबड्या बोलण्याने सगळ्यांना तिकडे गुंगवून टाकलस अन् इकडे त्या तुझ्या वस्ताद नेहाने साऱ्यांना गुंगारा दिला. असाच होता ना प्लॅन? इन्स्पेक्टर मोरे केतकीला फैलावर घेऊन विचारू लागल्या.
नकारार्थी मान हलवत केतकी मुसुमुसु रडु लागली.
“हे बघ केतकी, तुम्हा दोघीना हे प्रकरण भारी पडणार आहे. बऱ्या गुमान सांग, कुठे जाणार होती ती पळून? इन्स्पेक्टर मोरे यांनी जरा नरम आवाजात विचारून पाहिले.
“माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम, ती पळून जाणार आहे हेच मला माहिती नव्हतं. तर मी कसं सांगू ती कुठे जाणार होते ते ? केतकीने डोळे पुसत इन्स्पेक्टर मोऱ्यांनाच कोड्यात पाडले.
“केतकीच्या उत्तरांना संतापलेल्या इन्स्पेक्टर मोऱ्यांवी हातातल्या छडीचा प्रहार तिच्या पाठीवर आणि ढुंगणावर केला. केतकी अक्षरशः कळवली. इन्स्पेक्टर मोरे दाणकन दार आपटून बाहेर आल्या. वैतागून त्यांनी आदेश सोडला.
“चित्रा त्या पोरीला चांगल चोप, कशी धडाधड बोलते की नाही बघ. सारी पोलीस चौकी चिडीचुप झाली. एकटी केतकी मात्र कळवलत होती.
क्रमश:
फारच रंगत वाढत चाललीय ही कथा 👌👌👌👍👍🙏🙏